मी नवीन लग्न होऊन आले तेव्हा त्यांची स्वयंपाकघरात ओट्यापाशी मुख्य जागा ठरलेली होती. तिथे त्यांचीच सत्ता होती असं म्हणल तरी चालेल. पहीली दोन वर्ष मी त्यांची लिंबुटिंबु मदतनीस म्हणुन काढली. कुठे कांदा चिरुन दे, काकडी कोचुन दे, कुकरच्या शिट्ट्यांकडे लक्ष ठेऊन योग्य वेळी बंद कर, बटाटे सोल, डबे भर, असलीच सटरफटर काम ! त्यांच्या हाताखाली डोळे, कान, नाक उघड ठेऊन हळुहळु बरच शिकले आणि मग नकळतच मुख्य स्वयंपाकी म्हणून माझं प्रमोशन आणि लिंबुटिंबु गडी म्हणून त्यांचं आनंदाने व स्वेच्छेने डीमोशन झालं.
काही वर्षांनी त्यांनी कीचन सहज दिसेल अशी हॉलमधल्या सोफ्यावरची जागा पकडली. त्यांचं जपजाप्य, नामस्मरण चालू असताना एक कान, डोळा स्वयंपाकघराकडे असायचा. “कढी ऊतू जाईल ग, लक्ष आहे ना? बटाटे शिजले असतील, गॅस बंद कर, गाजर किसून देऊ का तुला? आमटीत मेथी घातलीस का? वास छान येतोय” अशी त्यांची कधीतरी अधुनमधुन टिप्पणी चालू असायची. काही जणींना हे असले शेरे त्रासदायक वाटू शकतात, पण मला नाही. कदाचित आमचं नातं तसं बऱ्यापैकी प्रेमाचं असल्यामुळे असेल. उलट त्यांचं बोलणं ऐकून, हा पदार्थ करताना काही चुकणार नाही, कोणा तरी मोठ्या माणसाचं लक्ष आहे आपल्यावर, आधार आहे असच सतत वाटत रहायचं.
सध्या मात्र त्यांची आवडीची जागा देवघरात आहे. तिथुन स्वयंपाकघरातलं काहीच दिसत नाही. त्यांच्या दृष्टीने आता त्यांचा किचनमधला कार्यभाग बऱ्यापैकी संपला आहे. सून करेल ते (आणि ती उत्तमच करेल यात त्यांना शंका नाही कारण ती त्यांचीच विद्यार्थिनी आहे !) दोन घास वेळेवर खाऊन आपल्या आवडत्या गोष्टींमध्ये मन रमवायचा त्यांचा निश्चय आहे आणि तो त्या उत्तम पार पाडत आहेत.
माझ्या सासुबाईंचा गृहस्थाश्रमातून वानप्रस्थात आणि आता चक्क संन्याश्रमापर्यंतचा प्रवास खरंच खूप शिकवुन जाणारा आहे. कंपनीत आलेल्या नवशिक्या एम्प्लॉयीला योग्य ते ट्रेनिंग देऊन, योग्य वेळी प्रमोट करुन, त्याला कंपनीच्या किल्ल्या सोपवून त्यांनी सुखाने रिटायरमेंट घेतली. ही रिटायरमेंट प्रत्येकाला जमतेच असं नाही. आवर्जुन सांगायची गोष्ट म्हणजे मला ट्रेन करायच्या आधी त्यांच्या मुलालाही किचनमधल्या चार गोष्टी येता जाता सहज शिकवल्या होत्या. (याचे मला प्रचंड फायदे होतात )
हे असं सगळ्यांबरोबर घडणार नाही हे अगदी मान्य आहे कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. त्यातून दोन बायका आणि स्वयंपाकघर हे तर अत्यंत नाजुक नातं! सूत जमलं तर भांडयांचे आवाजही सुरेल कीणकीण म्हणुन ऐकू येतील आणि नाही जमले तर फक्त आदळआपट ! पण तरीही स्वयंपाकघरातल्या काही गोष्टी ज्येष्ठ बायकांकडूनच शिकाव्यात असं मला आवर्जुन वाटतं. त्यांनी शिकवल्याची सर नेटवरच्या रेसिपींना येत नाही.
इंटरनेट प्रमाण सांगेल पण उकळी आल्यावरचा वास, पाकाची परफेक्ट तार आणि दमदमीत वाफ येण्यासाठीचं करेक्ट पातेलं नाही सांगू शकणार, यू ट्यूब एकवेळ कृती साग्रसंगीत दाखवेल पण पदार्थ बनवतानाचा फर्स्ट हँड अनुभव, आपल्या घरच्यांना आवडणारी ठराविक चव नाही सांगू शकणार. पोट भरण्याचे मार्ग इंटरनेट किंवा पुस्तकं शिकवतील पण आपल्या आवडत्या व्यक्तींच्या पोटात शिरण्याचे मार्ग फक्त घरातल्या सासवा, आया, आजेसासवा, मामी, काकू, तर कधीकधी ज्येष्ठ पुरुषमंडळी सुद्धा सांगू शकतील. माझ्या आईने साध्या मुगाच्या डाळीची खिचडी जरी केली तरी ती माझ्या आजीला मजेत फक्त पातेल्याला हात लावायला सांगायची. आणि ती साधी खिचडी पण काय चवदार लागायची!
आज मला व माझ्यासारख्या इतर अनेक जणींना वारसाहक्काने स्वयंपाकघरातील ज्ञान दिलेल्या सर्व मातांना “मदर्स डे” निमित्त अभिवादन! फक्त योग्य त्या वेळी आपली लुडबुड थांबवुन ती रिटायरमेंट घेऊन सन्यासाश्रमात जायची बुद्धी मात्र देवाने प्रत्येकाला वेळीच देवो ही प्रार्थना!
Keep up the fantastic work! Kalorifer Sobası odun, kömür, pelet gibi yakıtlarla çalışan ve ısıtma işlevi gören bir soba türüdür. Kalorifer Sobası içindeki yakıtın yanmasıyla oluşan ısıyı doğrudan çevresine yayar ve aynı zamanda suyun ısınmasını sağlar.
Hey, you used to write wonderful, but the last few posts have been kinda boring… I miss your super writings. Past several posts are just a bit out of track! come on!
You are a very bright person!