माझ्या सासूबाई त्यांच्या काळातल्या ग्रॅज्युएट. बीएपर्यंत शिक्षण नंतर लगेच लग्न. सासरी इतकं मोठं कुटुंब, की त्या घरात त्या आल्या अन दिवसरात्र कामाच्या चक्रात अडकून गेल्या. पुढे शिकायचा, नोकरी करायचा विचारही त्यांच्या मनाला कधी शिवू शकला नाही, कारण ती शक्यता त्यांच्याशिवाय इतर कोणाच्याही मनात देखील आली नाही. दिवसभर काम आणि फक्त काम, घरात गोतावळाच इतका होता. त्याकाळी बायकांनी शिशू वर्गाच (आताची अंगणवाडी) ट्रेनिंग घेऊन, बीएड करून शाळेत नोकरी करायची प्रथा होती. त्यांच्या मनात अनेकदा येऊन जाई, एखादा कोर्स करावा, किमान एखाद्या शाळेत तरी लागावं. पण घरकामाच्या धबडग्यात ते ही त्या विसरून जात. लग्नाआधी त्या कॉलेजमध्ये परीक्षांच्या वेळी सुपरव्हायझर म्हणून जात. ते काम त्यांना आवडे. थोडे पैसेही मिळत. लग्नानंतर घरातच इतकी सुपरव्हीजन करावी लागे की बाहेर जाऊन काम करण्याचा प्रश्नच कधी आला नाही. लग्नानंतर पहिली दहा वर्ष त्या घरकामाला अक्षरशः जुंपल्या गेल्या. पुढे माझ्या चुलत सासूबाई घरात लग्न होऊन आल्यावर त्यांना थोडा मोकळा श्वास घेता आला.
मुलंबाळ झाल्यावर तर त्यांच्या पुढील शिक्षणाच्या सगळया आशा मावळल्या. जी काही छोटेमोठी आशेची रोपटी मनात उगवली होती ती त्यांना स्वतःच खुडून टाकावी लागली. कालौघात अनेकदा आपण आपल्याला एकेकाळी काय करायचं होतं आणि आत्ता काय करत आहोत याचा मेळ घालणं सोडून देतो. बायकांच्या बाबतीत हे जास्त होतं. स्वप्न हळूहळू विसरली जातात. चाललंय हेच आयुष्य आपल्या नशिबात होतं आणि आपण हेच करणं अपेक्षित आहे असं वाटून काळ कंठत राहतो. आजूबाजूचा समाजही आपलं हेच कंडिशननींग करत राहतो. याचा अर्थ माझ्या सासूबाई दुःखी होत्या असं नव्हे. घरसंसारात, आल्यागेल्याचं करण्यात, देवाची उपासना करण्यात, मुलांचं संगोपन करण्यात रममाण होत्या पण आपण पुढचं शिक्षण घ्यायची मनातली उर्मी कुठेतरी त्यांनी दाबून टाकली आहे हे त्यांना स्वतःला पुरेपूर माहीत होतं. त्यांच्या बरोबरीच्या अनेक मैत्रिणी, ओळखीच्या बायका, नातेवाईक स्त्रिया नोकरी करत, बाहेर जात, त्यांचा त्यांना दुस्वास वाटे असं नाही पण आपल्या हातातून काहीतरी बारीकसं निसटलं आहे याची जाणीव मात्र त्यांना होती.
पुढे मुलांची लग्न होऊन आम्ही सुना घरात आलो. दोघी सुना मास्टर्स डिग्रीहोल्डर, नोकरी करणाऱ्या, स्वतःच्या पायांवर उभ्या म्हणून त्यांना आमचा कोण अभिमान! मी नाही करू शकले पुढे शिक्षण पण तुम्ही जे जमतंय, आवडतंय ते जरूर करा म्हणून त्यांनी आम्हाला सतत पाठींबा दिला. माझे तर हा सेमिनार, तो वर्कशॉप, ही परीक्षा, ती स्कॉलरशिप, तो थिसिस अशा त्यांनी अनेक गोष्टी सहन केल्या आहेत, सांभाळल्या आहेत. सहन अशासाठी म्हणते आहे कारण घरातल्या ज्येष्ठांना कधीकधी आपण गृहीत धरतो, त्यांनी त्यांची कामं सोडून आपल्याला मदत करावी ही आपल्याला रास्त वाटणारी पण पर्यायाने त्यांच्या सेट झालेल्या आयुष्यात अनेक ऍडजस्टमेंट करावी लागणारी अपेक्षा आपण करतो. त्यातून मग अनेक वादंग होतात. पण हे सर्व करताना त्यांनी मोकळ्या मनाने मला दुजोरा दिला. कोणत्याही सासूसुनेच्या नात्यात कधी वाद झालेच नाहीत असं सांगितलं तर मी।खोटं बोलत असेन. मात्र अटीतटीचे प्रसंग आले तेव्हा कधी मी माघार घेतली कधी त्यांनी. थोडक्यात आम्ही दोघींनी पाणी फार कलुषित होऊ न देता निभावलं म्हणायचं.
कधीकधी माझ्या जाऊबाई ऑफिसमधलं एखादं मोठं, महत्त्वाचं प्रोजेक्ट संपवून, दमून, घरी येऊन आलेलं सगळं टेन्शन, ऍसिडिटी, डोकेदुखी विसरायला खोलीत डोक्यावर उशी घेऊन शांत पडून राहतात. कधीकधी मी माझ्या कामाच्या ठिकाणचं अतिशय thankless काम करत स्वतःशीच चरफडत राहते तेव्हा त्यांना वाईट वाटतं, त्या मला विचारतात, “मी नाही केली कधी तुमच्यासारखी कामं. घरातच असायचे. आनंदात नव्हते असं नाही, मलाही अनेक इच्छा होत्या, अनेकदा मी ही चरफडायचे. स्वतःवर चिडायचे. यापेक्षा वेगळं आयुष्य असू शकलं असतं असं वाटून दुःख करून घ्यायचे. आणि आता तुम्हीही स्ट्रेसमध्ये असता. तारेवरच्या कसरती करता. आपल्यातलं नक्की सुखी कोण आहे गौरी?” या प्रश्नाचं उत्तर मला देता येत नाही. कारण गेली अनेक वर्ष अनेक पिढ्या या प्रश्नाचं अजून न मिळालेलं उत्तर शोधतायत. तरीही काळ जसजसा पुढे गेला आहे तसतशी बायकांच्या जीवनात, जडणघडणीत आमूलाग्र आणि महत्त्वाचे फरक पडत गेले हे अमान्य करता येत नाही. एक गोष्ट मात्र मी त्यांना नक्की सांगू शकते, की आमच्या पिढीकडे थोडा का होईना चॉईस असतो, प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्याचं धैर्य असतं. पैसा सगळी सुखं देत नाही पण आत्मविश्वास नक्की देतो.
अशा या माझ्या सासूबाईंना वयाच्या पासष्टाव्या वर्षी त्यांच्या पुढील शिक्षणाने खुणावलं. नुसतं खुणावलं नव्हे तर अगदी बासरी(!) वाजवून स्वतःकडे आकर्षित केलं.. इतकी वर्ष हूल देणारं क्वालिफिकेशन, ऑफिसमधली बॉसची पोझीशन, मानमरातब आता त्यांना मिळणार होतं.
आयुष्य प्रत्येकाला कधी ना कधी संधी देतच असतं. आलेल्या संधीचं आपण सोनं कसं करू शकतो हे आपल्यावर असतं. प्रत्येकाचे जसे दुःखाचे वाटे ठेवलेले आहेत तसे सुखाचेही ठेवलेले आहेत. कोणाचा विश्वास बसो न बसो माझ्या सासूबाईंना कोणीतरी ज्योतिषाने सांगितले होते, तुमचा राजयोग पन्नाशीनंतर आहे. तोपर्यंत अमाप कष्ट पडतील पण नंतर मात्र राणीसारख्या राहाल. आणि हे तंतोतंत खरं ठरलं. नेमकं पन्नाशीनंतरच त्यांना दोन्ही सुना आल्या आणि त्यांचा सुखाचा काळ सुरू झाला असं आम्ही दोघी सुना त्यांना चेष्टेत म्हणत असतो.
सासूबाईंना तशी लग्नाआधीपासूनच देवाची, उपासनेची, अध्यत्माची आवड होती. घरातले सर्वजण त्यांना मजेने “माताजी” म्हणत. माझ्या नवऱ्याचा एक आवडता डायलॉग आहे, “ए, माताजींना त्रास देऊ नकोस काय, ती शाप देईल! तिच्यात पॉवर आहे!” अनेक उपासना करताना त्यांना पाहिल्यामुळे त्यांच्यात एक शक्ती आहे असं त्याला ठाम वाटायचं, पूजेची तयारी, पूजा, फुलं, स्तोत्रपठण, उपासतपास, नैवेद्य, जपजाप्य हा त्यांचा आवडीचा प्रांत. मी लग्न होऊन घरात आले तेव्हा त्यांचे आठवड्यातले एकंदरीत उपास पाहून थक्क झाले होते. त्यांना म्हणायचे सुद्धा, आई तुमचे उपासाचे दिवस न मोजता ज्यादिवशी जेवता ते दिवस मोजले पाहिजेत. इतकं का आणि कशासाठी करता हे सगळं? शरीराची हेळसांड का? त्यावर त्या म्हणायच्या, ज्याच्यात राम मिळतो ते करावं. तुला तुझ्या शिकवण्यात राम मिळतो मला माझ्या रामात. कधीकधी मला वाटतं त्यांच्यातील वैराग्याला खतपाणीही घरच्या परिस्थितीने, तिथे पडलेल्या अनपेक्षित जबाबदारीच्या बोज्याने घातलं गेलं की काय? लग्नाआधी लग्नाबद्दल असलेल्या स्वप्नमयी कल्पनांमुळे आणि लग्नानंतर आलेले disillusions इतके मोठे असतात की काही स्त्रिया फार चटकन अलिप्त होतात असं माझं निरीक्षण आहे. त्यांचा अध्यात्म मार्ग तेव्हाच कधीतरी अधोरेखित झाला असावा.
काही वर्षांपूर्वी माझे सासूसासरे काही नातेवाईक मंडळींवरोबर शुकतालला पर्यटनासाठी गेले होते. त्याआधी त्यांचे चारधामही फिरून झाले होते. शुकतालला एक प्रचंड मोठे वडाचे झाड आहे. एक दिवस त्या झाडाखाली माझ्या सासूबाईंना दोन क्षण काही दिसेनासे झाले. डोळ्यांपुढे फक्त तेजस्वी प्रकाश दिसला. हे कोणाला खरं वाटो न वाटो, हे जसं त्यांनी मला सांगितलं आहे तसंच मी लिहीत आहे. याबद्दल त्यांनी इतर कोणाला काही सांगितले नाही. घरी परत आल्यावर मात्र त्यांनी झपाटल्यासारखा भागवत ग्रंथाचा अभ्यास सुरू केला. काय आणि कुठून प्रेरणा मिळाली कोणास ठाऊक पण त्या रोज थोडंथोडं वाचन करू लागल्या, नोट्स काढू लागल्या. एखाद्याला अनुभूती येते म्हणतात तशी आली होती बहुदा त्यांना. जिथे शक्य असेल तिथे भागवत कथा ऐकायला जाऊ लागल्या. घरची त्यांना तशी काळजी नव्हती. आम्ही दोघी सुनांनी त्यांना “बिनधास्त काय हवं ते करा आई, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत” म्हणत त्यांना पाठींबा दिला. आपल्या आवडीचं क्षेत्र मिळालं की माणूस तहानभूक हरपून त्याच्या ध्यासात लागतो. इतकी वर्ष फक्त चूल आणि मूल सांभाळलेल्या माझ्या सासूबाईंना त्यांच्या अभ्यासाचा मार्ग सापडला होता.
जसजसा त्यांचा अभ्यास होऊ लागला तसतसं त्यांच्यात एक प्रगल्भता येऊ लागली. माझे सासरे, जे अनेक वर्ष Man of the house ची भूमिका पार पाडत होते, ते त्यांचे असिस्टंट झाले. त्यांना अभ्यासात मदत करू लागले. त्या दोघांमधील हे role reversal मी फार जवळून पाहिलंय. घरात जराशा दबून असणाऱ्या, प्रत्येक गोष्टीत हो ला हो करणाऱ्या, स्वतःच मत फारसं ग्राह्य नसलं तरी चालेल असा विचार करणाऱ्या माझ्या सासूबाई दिवसागणिक बदलू लागल्या. सून म्हणून माझ्या घरात येण्यामुळेही त्यांना त्यांच्या बाजूने थोडीफार कुमक मिळाली असं समजून चालू. कारण समानतेच्या बाबतीत माझी मतं जरा नवीन, बऱ्याच जणांच्या दृष्टीने थोडी जहाल अशी आहेत. वेळप्रसंगी त्यांच्या मुलांनाही मी घरातल्या स्त्रीला आधी महत्त्व द्या हे मी ठणकावून सांगत आले आहे. प्रत्येक गोष्ट गळी उतरतेच असं नाही पण प्रयत्न विफलही जात नाहीत.
हळूहळू माझ्या सासूबाईंचा अभ्यास जसा पक्का होत गेला तसा त्यांनी स्वतः एक भागवत कथेचा सप्ताह करावा असं अनेकांनी सुचवलं. कधीही बाहेरच्या जगात पाय न ठेवलेल्या, कोणत्याही व्यसपीठावर एक शब्दही कधी बोलायला न गेलेल्या माझ्या सासूबाई आधी जरा बिचकल्या. मी हे कधी केलेलं नाही, कथा सांगणं सोपी गोष्ट नाही, श्लोकांचं पाठांतर लागतं म्हणत टाळू लागल्या. बराच आग्रह झाल्यावर मात्र एक दिवस तयार झाल्या. माझे सासरे त्यांचे मदतनीस झाले, त्यांनी सर्व बाह्य तयारी करून दिली. भागवतकथेची तयारी भरपूर असते. आणि एक दिवस काही जवळच्या नातेवाईंक आणि परिवारासमोर माझ्या सासूबाईंनी भागवत कथा सांगायला सुरू केली. हा सप्ताह असतो. पूर्ण सात दिवस न थकता बोलायचं असतं, कोणती कथा कधी सांगायची, कृष्णजन्म, गोपाळकला कधी करायचा, कोणती गाणी कधी गायची याचं प्लॅनींग करायचा असतं. ते त्यांनी व्यवस्थित केलं. सात दिवस व्यवस्थित न चुकता कथा सांगितली आणि त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन दणक्यात पार पडलं.
भागवत सप्ताह म्हणजे केवळ कथावाचन नसतं, तो भक्तीचा सोहळा असतो. अध्यात्मात ज्यांना खरा आनंद मिळतो, आपल्या जगण्याचं प्रयोजन जो शोधत असतो त्यानी एकदा तरी ही कथा ऐकावी. त्यातल्या अनेक कथा आपण आपल्या रोजच्या आयुष्यालाही कनेक्ट करू शकतो इतक्या त्या सत्याला, सद्यपरिस्थितीला धरून असतात. भगवान श्रीकृष्ण वेगळं काहीही सांगत नाहीत. फक्त रोजचं आयुष्य अधिक आनंदी, अधिक प्रगल्भ कसं करा इतकंच सांगतात. मी स्वतः अनेक कथा ऐकल्या आहेत आणि आपल्या पुराणांत किती सखोल ज्ञान जोडलेले आहे हे पाहून स्तिमित झाले आहे. एक सप्ताह झाल्यावर सासूबाईंचा आत्मविश्वास वाढला. त्यांनी अकरा सप्ताह करू असे मनाशी ठरवले आणि हळूहळू, एकेक करत ते सर्व पार पाडले. कधी कोणाच्या घरी पंचवीसतीस माणसांत तर कधी स्वतःच्या घरी अगदी चार माणसांत. ज्ञान माणसाला प्रगल्भ बनवतं. अज्ञानी निरक्षर माणसं सुखी नसतात असं नव्हे पण ज्ञानाचा मार्ग तुमच्यासमोर आनंदाचे अनेक मार्ग मोकळे करू शकतो. दररोज अभ्यास करणाऱ्या माझ्या सासूबाईंना पाहून मला “What was she missing all this time” हे पुरेपूर जाणवलं.
श्रीकृष्णाच्या भक्तीत रंगलेल्या माझ्या सासूबाईना त्यांचं calling अखेर गवसलं होतं. आता मला त्या वेगळ्याच व्यक्ती भासतात. त्यांची सप्ताहाची तयारी करताना एखाद्या कसलेल्या प्रोजेक्टमॅनेजर सारखी त्यांना सर्व मॅनेजमेंट करावी लागते. त्यांच्या हाताखालच्या लोकांना व्यवस्थित इन्स्ट्रक्शन द्यावे लागतात, त्यांच्याकडून काही कामं करून घ्यावी लागतात. कृष्णजन्म, गोपाळकाला, रासलीला साजऱ्या करताना टाइम मॅनेजमेंट त्यांना पहावी लागते. त्या ते सहजगत्या करतात. सजवलेल्या व्यासपीठावर त्या कथा सांगायला बसल्या की एखाद्या बॉसपेक्षा त्यांचा रुबाब कमी नसतो. माझं त्यांना सांगणं असतं, सात दिवस ऑफिसला जातो तसं फक्त सुंदर आणि कडक इस्त्रीच्या साड्या नेसायच्या, छान राहायचं. आणि त्या तशा राहतात. पण बाह्यरुपापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावरून आयुष्याच्या उत्तरार्धात काहीतरी मिळवल्याचा आनंद, तेज स्पष्ट दिसत असतं. अनेकदा एखादी कथा सांगताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळतात, इतक्या त्या या सगळ्याशी समरस झालेल्या असतात. श्रीकृष्णाची बासरी त्यांना प्रत्यक्ष ऐकू येते असं त्या म्हणतात. यापेक्षा एखाद्या विषयात अजून कसली डॉक्टरेट हवी?!
गेल्या वर्षांपासून त्यांचा एकही सप्ताह होऊ शकलेला नाही. वाचन, चिंतन सुरू आहे पण प्रत्यक्ष ऑफिसमध्ये काम नाही. सध्या तर यूट्यूब हा नवीन शिक्षकही त्यांना मिळाला आहे त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे, पण आपल्या सर्वांसारख्याच त्याही त्यांची “Workplace” मिस करतायत. देव करो आणि त्यांचे ऑफिस, सॉरी व्यासपीठही लवकर सुरू होवो. जय श्रीकृष्ण!