हाऊसवाईफ
साठ आणि सत्तरच्या दशकांत स्त्रिया काम करण्यासाठी बाहेर पडल्या, नोकरी व्यवसाय करायला लागल्या, त्यांची क्षितिजं विस्तारली ही चांगली बाब झाली. पण त्यामुळे बाहेरचं काम हे ग्लॅमरस आणि घरातल्या कामाच्या दर्जा कमी असा समज कळतनकळत रूढ होऊ लागला. ‘हाऊसवाईफ’ या शब्दाला दुर्दैवाने काहीशी नकारात्मक छटा आली. याबद्दल लिहायचं कारण, कारण
माझ्याकडे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दरवर्षी साधारण वीस टक्के प्रमाण हाऊसवाईफ्सचं असतं.
एका छोट्या किंवा मोठ्या ब्रेकनंतर या मुलींना (मुलीच म्हणते, कारण माझ्यासाठी या कायम मुलीच असणार आहेत) शिकायचं असतं, बाहेरच्या जगाशी स्वतःला जोडून घ्यायचं असतं. त्यामुळे थोड्याश्या बिचकत या मुली वर्ग जॉईन करतात. माझ्या दृष्टीने मात्र या विद्यार्थिनी स्टार विद्यार्थिनी असतात. नवीन काहीतरी शिकायच्या उर्मिने आसुसलेले यांचे लुकलूकते डोळे ही माझ्यासाठी एक मोठी प्रेरणा असते. वर्गात या विद्यार्थिनींने व्यापलेला एक छोटासा कोपरा माझ्यासाठी फार महत्त्वाचा असतो. तो मला माझ्यातल्या गृहिणीची आठवण तर करून देतोच, पण माझं काम करायला, शिकवायला खूप मोठी ऊर्जा देतो.
हाऊसवाईफ या उत्तम विद्यार्थिनी असतात. दिलेल्या वेळेत टास्क पूर्ण करण्यात त्यांचा हातखंडा असतो. त्यामुळे कोणतीही ग्रुप ऍक्टिव्हिटी घ्या, प्रत्येक ग्रुपमध्ये एक हाऊसवाईफ टाका, ऍक्टिव्हिटी वेळेत पूर्ण होणार म्हणजे होणार. गृहपाठात कोणतीही कसूर सोडत नाहीत या. बाकीचे विद्यार्थी टंगळमंगळ करत असले तरी यांना गृहपाठाचं महत्व पुरेपूर समजेलेलं असतं. त्यामुळे यांच्या वह्या सतत अपटूडेट असतात. मोकळ्या वेळेचं महत्त्व, त्यात करायला मिळणारं अध्ययन, धमाल, मजा, मस्ती, दोस्ती यांच्यापेक्षा कोण जास्त जाणणार? ‘इंग्लिश विंग्लिश’ मध्ये एका हाऊसवाईफच्या या ध्यासाचं किती उत्तम चित्रण केलंय! हाऊसवाईफ्स या वर्ग कधीही फारसा बुडवत नाहीत असं माझं निरीक्षण आहे. वर्गात नियमित येणार, अभ्यास व्यवस्थित करणार, नोट्स नीट काढणार, प्रत्येक शब्द लिहून काढणार, बिचकत का होईना शंका विचारणार, गृहपाठ व्यवस्थित पूर्ण करणार, परीक्षा म्हणलं की कसून तयारी करणार त्या या हाऊसवाईफ्स! सुरुवातीला ‘आंटी’ म्हणून पाहणारे, त्यांची चेष्टा करणारे बाकीचे सगळे विद्यार्थी हळूहळू यांच्या वह्या, शीट्स घेण्यासाठी चढाओढ करायला लागतात. वर्गातल्या हुशारातल्या हुशार विद्यार्थ्याला कळून चुकतं की आपल्यालाला जर कोणाची स्पर्धा असेल तर या ‘आंटी’ ची, कारण ती अभ्यासात फार पुढे असते.
माझ्या वर्गात मी दरवर्षी एक ‘रेसिपी स्पर्धा’ घेते. यात विद्यार्थ्यांनी काही जर्मन रेसिपीज बनवायच्या असतात. ही स्पर्धा मी वर्गात सांगते ना सांगते तोवर या हाऊसवाईफ्सचा उत्साह ओसंडून वाहायला लागलेला असतो, कारण हे त्यांच्या ओळखीचं कार्यक्षेत्र असतं. ज्या ग्रुपमध्ये एक हाऊसवाईफ असेल तो ग्रुप जिंकलाच असं समजायचं, कारण पदार्थाला लागणाऱ्या जिनसांचं, प्रमाण, रंग, रूप, चव यांच्यपेक्षा उत्तम कोणाला समजणार!!
सहा वर्षांपूर्वी रश्मी नावाची मुलगी माझ्या वर्गात आली. गोरीपान, छोटीशी रश्मी वर्गात अगदी शांत असायची. दोन लहान मुली होत्या तिला. दोघींची तयारी करून देऊन, सकाळी शाळेत पाठवून मग वर्गात यायची. वर्गात शिकवलेलं सगळं नीट आत्मसात करायची, गृहपाठ करायची, कधीही वर्ग बुडवायची नाही. तिची अडचण एकच होती, ती म्हणजे वर्गात बोलायचं नाही. कितीही प्रश्न विचारा, कितीही प्रोत्साहन द्या, बोलायची वेळ आली की ही तोंड घट्ट दाबून बसणार. भाषेच्या वर्गात न बोलून कसं चालेल? विशेषतः जर वर्षाच्या शेवटी १०० मार्कांची परीक्षा तेव्हा तर नाहीच चालणार.
मी हरतऱ्हेने रश्मीला समजावून पाहिलं. पण ‘भीती वाटते’ या तिच्या उत्तरावर मी काय बोलणार? इतकी उत्तम विद्यार्थिनी, लेखी परीक्षेत बाजी मारणार मात्र तोंडी परीक्षेत आपटी खाणार या विचाराने मला अस्वस्थ व्हायचं. या भीतीचं कारण अनेक हाऊसवाईफ्सना बाहेरचं एक्सपोजर न मिळणे, बाहेरच्या जगाशी फार कमी संबंध येणे असंही असू शकतं.
एक दिवस रश्मीला वर्गानंतर एकटीला थांबवून मी तिला तिची भीती घालवायचे काही उपाय सांगितले. यातला एक उपाय म्हणजे घरात एका खोलीत आरशासमोर उभं राहून स्वतःशीच जर्मन भाषेत संवाद साधायचा. सुरुवातीला तिला हा उपाय मजेशीर वाटला. पण मी लावून धरलं. रोज तिला वर्ग झाल्यावर ‘काल स्वतःशी किती बोललीस?’ असं विचारू लागले. मला उत्तर द्यावं लागतं म्हणून रश्मी रोजच्यारोज घरी सराव करू लागली. हळूहळू तिला हा सराव आवडू लागला आणि पाचाची दहा, दहाची पंधरा मिनिटं होऊ लागली. घरी नवरा, मुली तिला हसायच्या, पण ती ‘मॅम नी सांगितलंय’ या एकाच कारणास्तव स्वतःच्या सरावाचा पाठपुरावा करू लागली. वर्गात मला हळूहळू रश्मीमध्ये खूप सुधारणा दिसू लागली. आता ती स्वतःहून वर्गात बोलू लागली, प्रश्नांची उत्तरं देऊ लागली. तिची बोलायची भीड चेपली. मला अतिशय आनंद झाला. वर्गात अभावानेच बोलणारी मुलगी आता वर्गात सतत जर्मन भाषेत चटरपटर करू लागली.
यथावकाश परीक्षा झाली. रश्मी उत्तम मार्कांनी पास झाली, तोंडी परीक्षेत तिला बाहेरच्या परिक्षकाकडून ‘उत्तम बोलतेस’ म्हणून शेराही मिळाला. तिने पुढचा कोर्सही उत्तम पद्धतीने पार केला. एके दिवशी माझ्याकडे आली, ते ‘मॅम, मी अमेरिकेला जात आहे’ हे सांगायला. भारतातलं चंबूगबाळं उचलून, दोन मुलींना घेऊन ती कायमची अमेरिकेला जाणार होती. जे काही शिकली आहेस त्याचा उपयोग नक्की कर अशी गोड तंबी देऊनच मी तिला निरोप दिला. काळ पुढे सरकत गेला. रश्मीची जागा दुसऱ्या विद्यार्थिनी घेत गेल्या.
सहा वर्षांनी, म्हणजे मागच्या आठवड्यात माझ्या फोनवर मेसेज आला, ‘मॅम, मी रश्मी, तुम्ही ओळखलंत का मला? मी अमेरिकेत असते. तुम्हाला मेसेज करायचं कारण म्हणजे आज माझा अमेरिकेतला पहिला कोर्स मी घेऊन संपवला. मी इथे लहान मुलांचे जर्मन भाषेचे private classes घेते. आणि मॅम, Spoken जर्मन वर सर्वात जास्त भर देते. तुम्ही सांगितलेल्या सगळ्या ट्रिक्स वापरते. बोलायला आता अजिबात बिचकत नाही, मी ही आणि माझे विद्यार्थीही! All Thanks to you!
गुरूदक्षिणा अजून वेगळी काय असते? माझे डोळे भरून आले. हाऊसवाईफ रश्मी आता स्टार विद्यार्थिनीच नव्हे तर स्टार शिक्षिकाही झाली होती