iceberg, ice, antarctica-8008071.jpg

ट्रेक

ट्रेक सुरु झाला. सगळ्या लोकांच्या गराड्यात ती खूपच मागे पडली. तो मुलांबरोबर भरभर पुढे निघुन गेला. तिला जरा रागच आला. थोडं पण थांबू नाही का शकत? कीती दिवसांनी ट्रेकला म्हणून बाहेर पडलो, जरा छान एकत्र गेलो असतो. एकटीने एन्जॉय करता येत नाही अश्यातला भाग नाही, मस्तच वाटतं. ती होतीच डोंगरवेडी. पण आज एकंदरीतच वातावरण काय सुंदर आहे. मजा आली असती दोघ बरोबर असतो तर!
असो.
जंगलातली चिंचोळी वाट. एकावेळी एकालाच जाता येईल अशी. तिच्यासमोर नेमकं एक पाखरू जोडपं. बाईंनी शॉर्ट्स, टी शर्ट घालून, केस मोकळे सोडलेले, बाप्या त्यांचे गॉगल, हेयर क्लच झेलण्याच्या तयारीत.बाईंची सॅक ही अर्थातच त्याच्याच खांद्यावर.
कुठल्याही छोट्याश्या चढ़उतरणीला तिला हात धरूनच न्यावे लागत होते. त्यांचे संवाद तिच्या कानावर पडत होते.
“वापस जा के ना, शूज लेंगे नये वाले, ये comfortable नहीं है, तिच्या साधारण नव्याच ब्रांडेड बुटांकडे हात दाखवत ती म्हणत होती.

“ये leech है क्या, मुझे बहोत डर लगता है. इसको हटाव यहाँ से.”

“जरा पानी दो, म्हणल की लगेच पानी हजर.

जंगलात आज खरोखरं तुफ़ान सुंदर वातावरण होतं. आदल्या रात्री पडून गेलेल्या पावसामुळे किंचित ओलसर झालेली जमीन, पानांचा मस्त वास, किड्यांची कीरकिर. कुंद हवा. मधुन मधुन धुकं पण पडत होतं.तिचं मन उल्हासित झालं. असं अजून यायला पाहिजे अधुनमधुन. सगळे ताण विरुन जातात.

“काँटा लगेगा तो क्या करेंगे?”

“मम्मीजी को बोला है ना, दिया और बाती के सब एपिसोड रिकॉर्ड करने के लिए? मुझे तो घर जाके पहले वो देखने है.

“स्पेन का प्लान cancel नहीं करना चाहिए था हमें इस बार.. ये कहाँ आ गए हम?”

“अभी और कितनी दूर है झरना?”

आता मात्र तिला राग येऊ लागला. आणि का कोणास ठावुक त्याच्यावरच चिडली ती. झाली असतील लग्नाला खूप वर्ष पण म्हणून काय सोडून जायचं मला एकटीला.इतके गृहीत धरायला लागलो की काय आपण एकमेकांना? एकदा पण मागे वळुन बघू नये, मी कुठे आहे? काटा, लीच कश्या कश्याचं म्हणून कौतुक नाही. भेटला की ओरडतेच चांगली.

समोरच्या बाईंना तेवढ्यात धाप लागल्यामुळे पाखरू जोडप खाली दगडावर टेकलं. याचा फायदा घेऊन ती त्यांना ओलांडून चटकन पुढे गेली. झपाझप पुढे गेली आणि थोड्याच् वेळात आणखी माणसं दिसायला लागली. तो ही दिसला, मुलांना दगडाजवळ काहीतरी दाखवत होता. बऱ्याच दिवसांनी त्याला पाहिल्यावर तिला जे मन शांत झाल्याचं फीलिंग यायचं तेच आजही आलं. त्याच्या जवळ जाताच झऱ्याचं थंड पाणी भरुन ठेवलेली बाटली हातात देऊन तो म्हणाला, “काय हे, पट्टीची ट्रेकर तु, एरवी झरझर सगळ्यांच्या पुढे जातेस तु , आज कुठे मागे अडकलीस? आता तु आमची गाइड, चला पुढे, आम्हाला रस्ता दाखवा. दोन्ही मुलं सुद्धा, “Yeah” असं आनंदानी ओरडली. खुदकन हसत, सॅक पाठीवर टाकत तिने झऱ्याची वाट पकडली.
धुकं कमी होऊन समोरचा रस्ता आता अगदी स्वच्छ दिसत होता.