थीम पिंक
थीम पिंक
नवऱ्याच्या मित्रांचा एक ग्रुप असतो. अगदी शाळेपासूनचा असतो. शाळूमित्र हे कायम एकमेकांचे घट्ट मित्र असतात. भांडतील, चिडतील, एकत्र दारू पीतील, राडे घालतील, पण एकमेकांच्या हाकेला कायम ओ देतील, एकमेकांच्या आईवडिलांची काळजी घेतील, पैसे देवाणघेवाण करतील, अर्ध्या रात्रीत एकमेकांसाठी उभे राहतील. अशी चिरकाल टिकणारी मैत्री फार छान असते. एकमेकांचा भक्कम आधार असते. कालांतराने एकेकाची लग्नं होतात. ग्रुप विस्ताराला जातो. एकत्र गेट टूगेदर्स होतात. ग्रुपमधले मेंबर्स वाढत जातात, मैत्रीच्या कक्षा रुंदावत जातात. बायका माहेर सोडून सासरी येतात त्याबरोबर आपापले ग्रुपही सोडून येतात. म्हणायला मित्र,मैत्रिणी राहतात, वर्षाकाठी भेटतातही. पण घट्ट मैत्रीवाले ग्रुप्स फार थोडे राहतात. नवऱ्यांचा ग्रुप मात्र टिकून राहतो. बायका त्यात आपसूक सामील होतात. यावर खूप काही लिहिण्यासारखं आहे पण विषय तो नाही.
असेच आमच्या ग्रुपमधले एक उमा निखिल. उमा ग्रुपमध्ये जरा उशिरा आलेली पण आमच्यात रुळून गेली, रमून गेली. उमा दिसायला चारचौघींसारखी, लाघवी, बडबडी. निखिल देखणा, हुशार, मितभाषी, त्याच्या खोल डोळ्यांनी बरंच काही बोलणारा. निखिलकडे पाहून वाटतं देव जेव्हा काही मूठभर माणसांची स्पेशल बॅच बनवत होता तेव्हा त्यात निखिल होता. प्रेमळ, शांत, कोणत्याही प्रसंगात धीर न गमावणारा. दोघांत एक गोष्ट कॉमन, ती म्हणजे दोघांनाही मुलांची प्रचंड आवड. लहान मुलांमध्ये दोघेही रमून जात. अश्या या दोघांची नशिबाने मात्र चांगलीच परीक्षा घेतली. आज होईल उद्या होईल करत दोघे एका छोट्याश्या बाळाची वाट पाहत बसलेले. दोघांनाही ग्रुपमधल्या आमच्या सगळ्यांची मुलं अतिशय प्रिय. जेव्हा जेव्हा भेटतील तेव्हा त्यांच्यावर प्रचंड प्रेम करतील, खाऊ खेळणी आणतील, त्यांच्याबरोबर गप्पा मारतील, खेळतील.
आपल्या मनात असलेली प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी घडत नाही. काहीतरी हिसके, धक्के बस्तातच. उमा निखिल वाट पाहून थकले पण ती इवलीशी सोनपावलं त्यांच्या घराकडे काही वळेनात. सगळे शर्थीचे प्रयत्न करून झाले. लग्न होणे, मूल होणं इतकंच म्हणजे आयुष्याची इतिकर्तव्यता नाही. हे प्रत्येकाचे वैयक्तिक निर्णय असतात. एकदा का एखाद्या जोडप्याने आपल्याला मूल होणार नाही किंवा नकोच आहे हे स्वतःशी मान्य केलं की आयुष्य जगायलाही सोपं जातं. अशी कित्येक जोडपी जगात असतात. मूल हवंच असा अट्टाहास न करता, आयुष्यातल्या एक क्षणी नको हे सगळं, चाललंय ते ठीक चाललंय हे मान्य करून आनंदाने जगतात. गोची अशांची होते ज्यांना मनापासून मूल हवं असतं, ज्यांना पालकत्वाची प्रचंड आस असते आणि नेमकं त्यांनाच ते होत नाही. आम्ही मित्रमंडळी जरी जगभर पसरलो असलो तरी वॉट्सऍप, वर्षाकाठच्या भेटींमुळे संपर्कात होतो. उमाची हतबलता आम्हाला जणवत होती. फार भयंकर असते ही अवस्था एका जोडप्यासाठी. बॉडी क्लॉक पुढे जात असतं, नातेवाईक, मित्रमैत्रिणींची मुलं डोळ्यासमोर मोठी होत असतात, आयुष्याचं ध्येय एकच झालेलं असतं आणि नेमकं तेच आपल्याबाबतीत घडत नसतं.
डॉक्टरांनी, नियतीने हात वर केल्यावर उमा प्रचंड मोठ्या डिप्रेशनमधे गेली. कोणाशी बोलेना, भेटेना, एकलकोंडी झाली. तिच्यातली लाघवी, बडबडी उमा गायब झाली. डिप्रेशनमधल्या माणसांना उपचार घेता येतात, कोनसेलिंग करता येते, प्रश्न असतो त्यांच्या बरोबर त्यावेळी सोबत असलेल्या माणसांचा. या माणसांना कोणाचा आधार असतो? निखिल जरी देवाच्या स्पेशल बॅचमधला असला तरी शेवटी माणूस होता. जमेल तसं उमाला सांभाळत होता, ही अवघड परिस्थिती एकटा हाताळत होता. त्याचीही परीक्षाच होती एकोप्रकारे. चार पाच वर्षे अशीच गेली. आमची मुलं मोठी होत गेली. उमा निखिल लांबूनच त्यांना बघून आनंद मानू लागली.
काळ्याकुट्ट ढगाला सुद्धा चंदेरी किनार असते, बुडत्याला एखाद्या काडीचा आधार मिळतोच. एक वर्षांपूर्वी उमा निखिलचा मूल दत्तक घेण्याची सगळी प्रोसिजर पूर्ण झाली. याला कारणही ग्रुपमधल्या एका मित्राने त्यासाठी केलेली घडपड. त्यांना हवी तशी एक गोडगोड मुलगी त्यांना दत्तक मिळाली. प्रचंड आनंदाचा दिवस होता तो दोघांसाठी! मातृत्व आणि पालकत्व हे अमर्याद आनंद देणारे असते हे अमान्य कसं करून चालेल? सध्या उमानिखिलचे दिवस हे फक्त बाळ आणि बाळलीलांमध्ये जातायत. ग्रुपमधल्या आमच्या सगळ्यांची बाळं मोठी झाली असल्याने हे नवीन बाळ आमच्या सगळ्यांचं बाळ झालेलं आहे. त्याहूनही जास्त आनंदाचं कारण म्हणजे आमच्या उमा निखिलचे उजळलेले चेहरे पाहून आम्हाला खूप आनंद होतोय. मैत्री अशीच असते ना? मित्रांच्या दुःखात दुःख मानणारी, सुखात सुख. काल त्या तिघांचे एकत्र असे पहिल्या दिवाळीचे फोटो पाहिले. तिघांनीही गुलाबी कपडे घालून पिंक थीम साजरी केली. गुलाबी रंग जसं प्रेमाचं प्रतिक असतो तसा धैर्याचा, सर्व लिंगसापेक्ष भावनांना छेद देणाराही असतो. उमानिखीलच्या आनंदाचा रंगही त्यामुळेच गुलाबी आहे. फोटो पाहून मला जो प्रश्न नेहमी पडतो तोच कालही पडला. दत्तक मुलं ही थेट त्यांच्या दत्तक आईबाबांसारखीच कशी काय दिसतात? इतकं साधर्म्य येतं कुठून की ते एकमेकांचे नसूनही इतके एकमेकांचे वाटावेत? हळूच उत्तरही येतं, कारण प्रत्येकाचे लागेबांधे ठरलेले असतात. कितीही काहीही ठरवलं तरी आपल्याशी ज्यांचा संबंध येणार असतो ती माणसं आपल्या छोट्याश्या परिघात येतातच.
थीम पिंकमुळे, त्या गुलाबी ड्रेसमधल्या गोडुलीमुळे काल खऱ्या अर्थाने आम्हा सर्वांची दिवाळी साजरी झालयासारखं वाटलं.